Top News

जळगाव जिल्ह्यात ७०९ किलो गांजाचा कायदेशीर नाश, एनडीपीएस कायद्यांतर्गत १९ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल नष्ट

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या आणि तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या अंमली पदार्थांविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने निर्णायक कारवाई केली आहे. एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध १९ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल ७०९.२८० किलोग्रॅम गांजा आज, २४ डिसेंबर रोजी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ही कारवाई करण्यात आली. यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती स्थापन करण्यात आली होती.

ही प्रक्रिया जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत राबवण्यात आली. समितीचे अध्यक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, सदस्य अपर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या उपस्थितीत जप्त मुद्देमालाच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली. त्यानंतर दोन शासकीय पंचांच्या साक्षीने व सहाय्यक कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या देखरेखीखाली खड्डा खोदून संपूर्ण गांजा नष्ट करण्यात आला. पारदर्शकतेसाठी या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले.

ही महत्त्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय दोरकर, संदीप पाटील, सुनील दामोदरे, संदीप चव्हाण, जयंत चौधरी, राहुल बैसाने, रवींद्र चौधरी, नीता राजपूत तसेच चालक दर्शन ढाकणे यांनी सहभाग घेतला. यावेळी वजनमापे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे यांचीही उपस्थिती होती.

ही कारवाई जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील पोलीस दलाच्या कठोर भूमिकेचे द्योतक ठरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने