जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या नियुक्त्यांचे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
या नियुक्ती प्रक्रियेदरम्यान तहसीलदार उमा ढेकळे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्या स्थानिक रहिवासी असून त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने, कोणताही हितसंबंधाचा आभास निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी स्वतःहून या नियुक्तीतून वगळण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या या पारदर्शक भूमिकेची दखल घेत प्रशासनाने त्यांची विनंती मान्य केली असून, त्यांच्या जागी जळगाव तहसीलदार शीतल राजपूत यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जितेंद्र पाटील, निवृत्ती गायकवाड, जितेंद्र कुवर, महेश चौधरी, मंजूषा घाटगे आणि विनय गोसावी यांचा समावेश आहे. हे अधिकारी निवडणुकीतील विविध टप्प्यांवर निर्णयप्रक्रिया, आचारसंहिता अंमलबजावणी तसेच एकूण प्रशासनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
या निर्णय अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी मोठ्या संख्येने सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये सुरेश कोळी, मंजूश्री गायकवाड, घृष्णेश्वर साळुंके, पंकज गोसावी, दादाजी जाधव, प्रसाद पुराणिक, ज्योती वसावे, जयंत शिरसाठ, ज्योती गुंजाळ, अविनाश गांगोडे, प्रकाश पाटील, विजय सूर्यवंशी, मंगेश देवरे, विशाल सुर्वे, विनोद पाटील, नितीन बागुल आणि विजय मराठे यांचा समावेश आहे.
महानगरपालिका निवडणूक ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने, कोणताही वाद किंवा गैरसमज होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर विशेष भर दिला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमधून प्रशासनाची ही भूमिका अधोरेखित होत असून, येणारी निवडणूक शांततेत आणि नियमानुसार पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा