Top News

भुसावळ उपविभागाला नवे डीवायएसपी : केदार बारबोले यांची नियुक्ती, गुन्हेगारांत खळबळ

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबत अधिकृत आदेश काढले असून, या निर्णयामुळे भुसावळ उपविभागातील गुन्हेगार व अवैध कारवायांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही बदली कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केदार बारबोले यांनी सन २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून सेवा बजावली असल्याने जिल्ह्याच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीची त्यांना चांगली जाण आहे. शांत स्वभाव, शिस्तप्रिय कामकाज आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ उपविभागात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, तसेच सामाजिक व जातीय सलोखा अधिक दृढ होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सध्याचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांची पदोन्नतीसह अपर पोलिस अधीक्षक किंवा सहाय्यक पोलिस अधीक्षकपदी बदली होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या बदलीचे आदेश येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची चर्चा आहे. गावीत यांनी ३१ जुलै २०२५ रोजी भुसावळ येथे पदभार स्वीकारला होता.

त्यांच्याआधी कार्यरत असलेले कृष्णात पिंगळे यांची पुणे अमली पदार्थ विरोधी विभागात बढतीसह बदली झाली होती. आता केदार बारबोले यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ पोलिस दलात नव्या, कणखर आणि प्रभावी अधिकाऱ्याचा प्रवेश झाल्याची चर्चा शहरासह परिसरात रंगू लागली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने