Top News

चाळीसगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर दगडफेक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारामुळे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याच्या रागातून अपक्ष उमेदवाराच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संबंधित कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभाग क्रमांक ३ मधील नगरपालिका निवडणुकीत पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्याचा राग मनात धरून शिवराज पाटील, रोहित चौधरी, अजय राजपूत आणि नीलेश चौधरी यांनी अपक्ष उमेदवार राकेश भीमराव बोरसे यांच्या स्वामी विवेकानंद कॉलनीतील घरावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. ही घटना २१ तारखेला दुपारी सुमारे २.४५ वाजता घडली.

तक्रारीनुसार, नगरसेवकपदासाठी नितीन पाटील हे निवडून येणारे उमेदवार होते, तुम्ही अपक्ष म्हणून का उभे राहिलात, तुमच्यामुळेच नितीन पाटील यांचा पराभव झाला, असे म्हणत आरोपींनी बोरसे यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. तसेच मोठमोठ्याने शिवीगाळ करत बोरसे यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे राकेश बोरसे यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

या प्रकरणी संबंधित आरोपींसह इतरांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३५१ (२), ३५१ (३), ३५२ आणि ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. नगरपालिका निवडणुकीनंतर घडलेल्या या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने