जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I येत्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जळगाव महापालिकेच्या निवडणूक प्रभारीपदी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यापूर्वीही भाजपने आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर लोकसभा तसेच विविध नगरपालिकांच्या निवडणुकांची जबाबदारी विश्वासाने सोपवली होती. त्या निवडणुकांमधील अनुभव आणि संघटनात्मक कामगिरी लक्षात घेता, जळगाव महानगरपालिकेसाठीही त्यांचीच निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची निवडणूक यंत्रणा अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांची महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील संघटन, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रभागनिहाय रणनीती आखली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या दोन्ही नियुक्त्यांचे अधिकृत नियुक्तीपत्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप अधिक ताकदीने उतरून सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने तयारीला लागल्याचे या नियुक्त्यांमधून स्पष्ट होत आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात भाजपकडून संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा