जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूल येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा सहपरिवार वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापनाच्या वतीने प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांचा सन्मान करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अश्विनी जोगदंड तसेच औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातील उप पोलीस निरीक्षक राजेंद्र उगले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे सहपरिवारासह स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्कारांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
या कार्यक्रमात सेंट टेरेसा हायस्कूलमध्ये सलग 25 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या वाहनचालकांचा विशेष गौरव करण्यात आला. कन्हैयालाल तिवारी, प्रकाश जाधव, प्रकाश पाटील, अमन शेख, भरत वाघ, संजय पाटील, राजेंद्र पाटील, विठ्ठल पाटील, किशोर पाटील, सुनील वाणी, रईस शेख आणि सोमनाथ गायकवाड यांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक क्षेत्रातील प्रथम महिला रिक्षा चालक पूनम गाजरे आणि प्रथम महिला व्हॅन चालक निकिता पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय शाळेतील विद्यार्थी वाहतूक करत असताना अकस्मात निधन झालेल्या वाहनचालक राजेंद्र देशमुख व रविंद्र सोनवणे यांच्या पत्नी व परिवाराला स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, दिनांक 14 डिसेंबर रविवार रोजी शाळेतर्फे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघांचाही यावेळी गौरव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज संघ विजेता ठरला, सेंट टेरेसा शाळा संघ उपविजेता, शहीद भगतसिंग संघ तृतीय तर वीर सावरकर संघ चतुर्थ क्रमांकावर राहिला. या संघांना चषक व खेळाडूंना वैयक्तिक स्मृतिचिन्ह देण्यात आली. तसेच सेवन स्टार, स्वराज्य ग्रुप, छत्रपती संभाजी महाराज आणि चंद्रशेखर आझाद संघातील खेळाडूंना सहभाग स्मृतिचिन्ह देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी, शाळेने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा इतक्या मोठ्या प्रमाणात सन्मान केल्याचे प्रथमच पाहिल्याचे सांगत मुख्याध्यापिका व व्यवस्थापकीय समितीचे कौतुक केले. तसेच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे व कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अश्विनी जोगदंड यांनीही वाहनचालकांना मार्गदर्शन केले. उप पोलीस निरीक्षक राजेंद्र उगले यांनी या संपूर्ण आयोजनाचे श्रेय शाळेच्या व्यवस्थापकीय समितीस देत कार्यक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी जळगाव शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येक शाळेतील एक वाहनचालक आमंत्रित करण्यात आला होता. उपस्थित प्रतिनिधींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान वाहनचालकांनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या संपूर्ण कार्यक्रमाला मेट्रो फॅशन आणि टिप टॉप या दुकानांच्या संचालकांचे प्रायोजकत्व लाभले. हा कार्यक्रम सेंट टेरेसा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलेट, व्यवस्थापिका मदरजी सिस्टर सेलिन आणि उपमुख्याध्यापिका सिस्टर डेला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वाहनचालक प्रतिनिधी गणेश शिंदे, दिलीप सपकाळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अनिता चौधरी आणि क्रीडा शिक्षक जितेंद्र शिंदे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा