Top News

क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने लेखापरीक्षकाची ४९ हजारांहून अधिक रकमेची फसवणूक

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I क्रेडिट कार्ड बंद करून नवीन कार्ड काढून देतो, असा बहाणा करून आवश्यक कागदपत्रे घेऊन सहकारी संस्थेच्या विशेष लेखापरीक्षकाची तब्बल ४९ हजार ३८ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणूक २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत गणेश कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी कपिल पाटील (पूर्ण नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही) याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश कॉलनी भागातील दुसरे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) कार्यालयात कार्यरत असलेले मोहन वेरांग्या पावरा (रा. दादावाडी, जळगाव) हे २९ जानेवारी रोजी आपल्या कार्यालयात काम करत असताना कपिल पाटील नावाची व्यक्ती त्यांच्याकडे आली. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख देत, जुने क्रेडिट कार्ड बंद करून नवीन क्रेडिट कार्ड काढून देण्याची प्रक्रिया असल्याचे सांगितले.

विश्वास संपादन केल्यानंतर कपिल पाटील याने मोहन पावरा यांच्याकडून आधारकार्ड व पॅनकार्डची छायांकित प्रत घेतली. त्यानंतर पावरा यांच्या नावाने नवीन क्रेडिट कार्ड तयार करण्यात आले. मात्र, या कार्डशी संबंधित मोबाईल क्रमांक आरोपीने स्वतःचा अपडेट केल्याने सर्व व्यवहारांची माहिती त्यालाच मिळू लागली.

यानंतर आरोपीने वेळोवेळी या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून एकूण ४९ हजार ३८ रुपये काढून घेतले. काही काळानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहन पावरा यांनी या प्रकरणी चौकशी केली. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी त्यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पावरा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कपिल पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, कोणालाही वैयक्तिक कागदपत्रे किंवा बँकिंग माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने