जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यात खासगी कंपनीत एकत्र काम करणाऱ्या मित्रांमधील जुन्या वादाचा शेवट अत्यंत गंभीर गुन्ह्यात झाल्याची घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील बेपत्ता तरुण निलेश राजेंद्र कासार (वय ३०) याचा खून त्याच्याच दोन सहकाऱ्यांनी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मृतदेह पोत्यात भरून धरणात टाकण्यात आल्याची माहिती समोर आली असून एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
निलेश कासार हा जळगाव येथील एलटीआय फायनान्स या कंपनीत कार्यरत होता. याच कंपनीत दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई, ता. एरंडोल) सध्या काम करत असून भूषण बाळू पाटील (वय २०, रा. पिंपरी, ता. चोपडा) हा पूर्वी त्या ठिकाणी नोकरीला होता. काही महिन्यांपूर्वी निलेश व भूषण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद मनात ठेवून भूषणने निलेशविरोधात कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. १५ डिसेंबर रोजी फायनान्सशी संबंधित विषयावर चर्चा करण्याचा बहाणा करून भूषण व दिनेश यांनी निलेशला शिरसोली परिसरात बोलावले. तिथे पुन्हा वाद झाला आणि त्यातून निलेशचा खून करण्यात आला. नंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून नेव्हरे धरणात टाकण्यात आला.
निलेश बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, रामदेववाडी परिसरात निलेशची दुचाकी बेवारस अवस्थेत आढळून आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी कॉल रेकॉर्ड तपासले असता निलेशचा शेवटचा संपर्क दिनेश व भूषण यांच्याशी झाल्याचे निष्पन्न झाले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या माहितीनुसार शुक्रवारी (१९ डिसेंबर) सकाळी पोलिसांनी नेव्हरे धरणातून निलेशचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, निरीक्षक बबन आव्हाड व पोलिस पथक उपस्थित होते. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. निलेशच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
टिप्पणी पोस्ट करा