Top News

जळगाव जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहीम : १,१०६ वाहनांवर कारवाई, लाखोंचा दंड वसूल

🚔 वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा करडा प्रहार; अपघात रोखण्यासाठी जिल्हाभरात कडक नाकाबंदी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वाहतूक शाखांना कडक नाकाबंदी करून तपासणी करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाभरात विविध ठिकाणी पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली. या मोहिमेत प्रामुख्याने विना नंबर प्लेट वाहने, अल्पवयीन वाहन चालक, वाहन परवाना नसलेले चालक, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

या विशेष तपासणी मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकांनी सक्रिय सहभाग घेतला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत एकूण १,१०६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तब्बल १३ लाख ७१ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अनेक वाहनचालकांकडून नियमभंग आढळून आला असून काही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन, अपघातांचे वाढते प्रमाण तसेच गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने