जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात एका उद्योजकावर रिक्षेने पाठलाग करून कार अडवत चौघा-पाच जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रेमंड चौकात घडली. या प्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्योजक संजय रामगोपाल तापडिया हे बुधवारी रात्री कंपनीतून घरी परतत असताना त्यांच्या कारचा (क्र. एम.एच. १९ ई.पी. १८१०) एका अज्ञात रिक्षाचालकाने पाठलाग सुरू केला. संशय आल्याने तापडिया यांनी रस्ता बदलला, मात्र रिक्षाचालकाने त्यांच्या कारला अडवून रिक्षेतील चार ते पाच जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्याच्या मागील बाजूस टणक वस्तूने मारहाण झाल्याने त्यांना तीन टाके पडले असून उपचार सुरू आहेत.
या घटनेचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेतर्फे दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना देण्यात आले.
निवेदन देताना युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रीतम शिंदे, गौरव चंदनकर, खुशल शर्मा, आकिब शेख, कार्तिक खैरनार, ओम खचणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर युवासेना पदाधिकाऱ्यांनी जखमी उद्योजक संजय तापडिया यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी दूरध्वनीद्वारे माजी मंत्री सुरेश जैन तसेच शिवसेना उपनेते व जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी तापडिया यांच्या आरोग्याविषयी चर्चा करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या घटनेने शहरातील उद्योजक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा