Top News

जळगावात एसटी वर्कशॉपमधील ४९ वर्षीय हेड मॅकेनिकची आत्महत्या

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील एसटी वर्कशॉप परिसरात बुधवारी पहाटे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एसटी वर्कशॉपमध्ये हेड मॅकेनिक म्हणून कार्यरत असलेल्या सुनील संतोष पवार (वय ४९) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पवार हे जळगाव एसटी वर्कशॉपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हेड मॅकेनिक पदावर कार्यरत होते. ते वर्कशॉपलगत असलेल्या शासकीय क्वार्टरमध्ये पत्नी व मुलासह वास्तव्यास होते. मंगळवार- बुधवारच्या दरम्यानच्या रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या खोलीत गळफास घेतला.

बुधवारी पहाटे मुलगा उठल्यावर घरातील खोलीचे दार बंद असल्याचे लक्षात आले. त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला असता, आत वडिलांचा गळफास घेतलेला मृतदेह दिसला. त्यानंतर मुलाने तत्काळ शेजाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागृहात हलविण्यात आला. प्राथमिक तपासानुसार आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आर्थिक अडचण, मानसिक तणाव किंवा कौटुंबिक कारणांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे एसटी वर्कशॉपमधील सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने