Top News

ब्रेकींग I शिर्के मोटार ड्राइविंग स्कुलचे संचालक अविनाश राजेशिर्के यांचे निधन

 
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील स्वतंत्र चौक परिसरातील रहिवासी तसेच शिर्के मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अविनाश अनंत राजेशिर्के (वय ४४) यांचे आज बुधवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने जळगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अविनाश राजेशिर्के हे मनमिळावू, हसतमुख व समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. अनेक वर्षांपासून त्यांनी शिर्के मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून शेकडो युवक-युवतींना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांनी यशस्वीपणे वाहन परवाने प्राप्त केले. प्रामाणिकपणा, शिस्त व सुरक्षित वाहनचालनावर त्यांचा विशेष भर होता.

आज सकाळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार, विद्यार्थी व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्वतंत्र चौक येथील निवासस्थानापासून नेरी नाका स्मशानभूमीकडे निघणार आहे. अविनाश राजेशिर्के यांच्या निधनाने जळगाव शहराने एक कर्तव्यदक्ष व समाजोपयोगी व्यक्तिमत्त्व गमावले असून सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने