जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यात लाचखोरीची आणखी एक गंभीर घटना समोर आली असून रावेर राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विजय पाटील यांना दहा हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत लाच स्वीकारण्यासाठी वापरण्यात आलेला खासगी पंटर भास्कर चंदनकर यालाही अटक करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई रावेर तालुक्यातील खानापूर येथे करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली असून प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही मान शरमेने खाली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांवर यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात पुढील कारवाई टाळण्यासाठी दुय्यम निरीक्षक विजय पाटील यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्यास स्पष्ट नकार देत तक्रारदाराने जळगाव एसीबी कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली.
तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. यावेळी आरोपी अधिकाऱ्याने थेट लाच स्वीकारण्याऐवजी ती रक्कम खासगी पंटर भास्कर चंदनकर याच्याकडे देण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले. ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंटर भास्कर चंदनकर याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर दुय्यम निरीक्षक विजय पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास जळगाव एसीबी करत आहे. सरकारी अधिकारी खासगी पंटरमार्फत लाच स्वीकारण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, लाच मागितली गेल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा