Top News

जळगाव जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना मिळाली नवी दृष्टी

जिप सीइओ मीनल करनवाल यांच्या पुढाकारातून उपक्रमाला सुरुवात 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमाच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना नवी दृष्टी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संवेदनशील पुढाकारातून मिशन दृष्टी हा उपक्रम साकार झाला आहे.

आरोग्य विभागामार्फत आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली असता, सुमारे ५०० विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र आवश्यक निधीअभावी या विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देणे शक्य झाले नव्हते. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून तसेच काही सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने या विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी मिशन दृष्टी या उपक्रमाची घोषणा करून त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात १० विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना केवळ दृष्टीच नव्हे, तर शिक्षण आणि आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण हीच खरी गुंतवणूक आहे. प्रत्येक मुलाच्या डोळ्यात ज्ञानाची आणि उज्ज्वल भविष्यातील ज्योत कायम प्रज्वलित राहावी, हीच आपली जबाबदारी आहे.”

या उपक्रमासाठी आरोग्य विभाग, आश्रम शाळांचे शिक्षकवर्ग आणि सहकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे जिल्हा परिषदेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने