जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील मेहरुण परिसरात आज दुपारी क्रिकेट खेळण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाने काही मिनिटांतच गंभीर रूप धारण केले. वाद वाढताच गवळीवाडा, टिपू सुलतान चौक आणि तांबापुरा परिसरात दगडफेक झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तसेच अतिरिक्त पोलिस दल आणि आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
चार जण जखमी, काही घरांचे नुकसान
दगडफेकीत चार जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच काही घरांच्या काचा फुटल्याचे आणि किरकोळ नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने कोणतीही गंभीर जखमी किंवा मोठी हानी झालेली नाही.
अफवा न पसरवण्याचे पोलिसांचे आवाहन
घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. “परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच सोशल मीडियावर जातीय सलोखा बिघडविणारे संदेश किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
घटनेदरम्यान काही दंगेखोर मोबाईल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून या फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे आणि त्यांच्या अटकेसाठी कारवाई सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा