जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात गुन्हेगारी घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, शुक्रवारी दि. १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, एका तरुणावर सलग दोन राऊंड फायर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिदास कोळी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री स्टेशन परिसरात शुकशुकाट असताना अज्ञात हल्लेखोरांनी रोहिदासला गाठत कोणताही विचार न करता त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहिदास कोळी याला तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकेबंदी केली. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तपास अधिक प्रभावी करण्यासाठी नाशिक किंवा धुळे येथून फॉरेन्सिक पथक पाचारण करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत.
टिप्पणी पोस्ट करा