Top News

जळगाव तालुक्यातील चिंचोलीजवळ ट्रॅक्टर–पिकअपचा भीषण अपघात; कामगाराचा जागीच मृत्यू

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ शुक्रवारी दुपारी सुमारे दोन वाजता सिमेंट वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि एका मालवाहू पिकअप वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टरवरील एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात संजय नामदेव सोनवणे (वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय सोनवणे हे जळगाव येथील मालधक्क्यावर सिमेंटच्या गोण्या भरणे व उतरवण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे इतर सहकाऱ्यांसह सिमेंट भरलेला ट्रॅक्टर (क्रमांक MH 19 BG 6078) घेऊन चिंचोली गावाकडे गेले होते. सिमेंट खाली करून जळगाव शहराच्या दिशेने परत येत असताना, समोरून येणाऱ्या भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत संजय सोनवणे ट्रॅक्टरवरून खाली फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

संजय यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या राहत्या गेंदालाल मिल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने