जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई केली आहे. महसूल प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर कारवाया होत असताना, एलसीबीने शुक्रवारी (दि. ७ नोव्हेंबर) खेडी खुर्द गावातील नदीपात्रावर धडक कारवाई करत तीन ट्रॅक्टर, किनी मशिन आणि सुमारे १५ ब्रास वाळू जप्त केली आहे.
नदीपात्रावर एलसीबीचा छापा
खेडी खुर्द परिसरात गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ विजय पाटील, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, रविंद्र कापडणे आणि तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला.
या छाप्यात वाळू उपसा करणारे आरोपी नदीपात्रात ट्रॅक्टरला किनी मशिन लावून वाळू काढताना आढळले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नदीपात्रातून सुमारे १५ ब्रास वाळू, तीन ट्रॅक्टर आणि किनी मशिन असे एकूण लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले.
या प्रकरणात रविंद्र गोकुळ सपकाळे (रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) या वाळू माफियाने नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याच्या घरासमोर तीन ट्रॅक्टर उभे करून वाळू वाहतुकीची तयारी सुरू असल्याचेही पथकाने पाहिले.
कारवाईनंतर पोलिसांनी जप्त साहित्य जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आणून ठेवले असून, या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई जिल्ह्यातील वाळू माफियांना मोठा धक्का मानला जात आहे. महसूल प्रशासनानेही अशा प्रकारच्या अवैध उत्खननावर सातत्याने कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा