गणपती व हनुमान मंदिर परिसरात दर शनिवारी सायंकाळी सामूहिक आरती, हनुमान चालीसा पठण, प्रसाद वाटप व संस्कार उपक्रमाचे आयोजन
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शहरातील आदर्श नगर परिसरात गेल्या वर्षभरापासून एक आगळावेगळा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. रुस्तमजी स्कूल शेजारील गणपती मंदिर व हनुमान मंदिरात दर शनिवारी सायंकाळी भक्तीमय वातावरणात सामूहिक आरती, हनुमान चालीसा पठण, प्रसाद वाटप आणि संस्कार उपक्रमाचे आयोजन केले जाते. ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेला हा उपक्रम आता परिसरातील एक सुंदर परंपरा बनला आहे.
या कार्यक्रमात दर आठवड्याला शंभर ते सव्वाशे नागरिक सहभागी होत असून, महिला, पुरुष, लहान मुले अशा सर्व वयोगटांतील भक्त सहभागी होतात. गणपती मंदिरात परिसरातील सर्व महिला मिळून सामूहिक आरती करतात, तर हनुमान मंदिरात पुरुष मंडळी आणि गोपाल मंडळी एकत्र येऊन हनुमान चालीसा पठण करतात. आरतीनंतर प्रसाद वाटप करून भक्तिभावाचे वातावरण अधिक मंगलमय केले जाते.
उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे—आरतीनंतर उपस्थित लहान मुलांना प्रत्येक शनिवारी विविध स्वरूपातील भेटवस्तू दिल्या जातात. या माध्यमातून मुलांमध्ये धार्मिक संस्कार, भक्तीभाव आणि समाजात सहभागी होण्याची जाणीव विकसित केली जाते. तसेच, त्या दिवशी वाढदिवस असणाऱ्या भाविकांचा वाढदिवस मंदिर परिसरातच सर्वांच्या उपस्थितीत साजरा केला जातो, ज्यामुळे समाजातील एकोपा आणि आनंदाची भावना वृद्धिंगत होते.
या भक्ती उपक्रमात भारतीय संस्कृती, सनातन परंपरा आणि जीवनमूल्यांबद्दल लहान मुलांना थोडक्यात मार्गदर्शन व प्रेरणादायी संबोधन केले जाते. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “आदर्श नगरमध्ये सुरू असलेली ही भक्तीची परंपरा समाजात एकतेचे, सकारात्मकतेचे आणि संस्कारांचे बीज पेरत आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
अनेक नागरिकांच्या मतानुसार, अशा प्रकारचे भक्तिमय आणि सामाजिक उपक्रम शहरातील इतर भागांतील मंदिरांनी देखील राबवावेत, जेणेकरून समाजात सामूहिक भक्तीभाव आणि एकतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल.
टिप्पणी पोस्ट करा