सात वर्षांच्या उल्लेखनीय सेवेनंतर जंजीरची सेवानिवृत्ती; पोलिस अधिकाऱ्यांकडून भावनिक निरोप
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव जिल्हा पोलिस दलातील दक्ष, प्रशिक्षित आणि विश्वासू श्वान ‘जंजीर’च्या सेवानिवृत्तीचा समारंभ आज अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, श्वान पथक प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक देविदास वाघ तसेच श्वान हस्तक पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे आणि पोहेकॉ संदीप परदेशी यांची उपस्थिती होती.
‘जंजीर’चा जन्म 18 नोव्हेंबर 2017 रोजी झाला असून, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नऊ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण त्याने यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर 7 एप्रिल 2018 रोजी तो जळगाव जिल्हा पोलिस दलात दाखल झाला. त्यानंतर गेल्या सात वर्षांच्या सेवाकाळात जंजीरने चाळीसगाव, भुसावळ शहर, एमआयडीसी आणि इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या विविध गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
गुन्ह्यांमधील आरोपींचा मागोवा घेण्यात, शस्त्रास्त्रे व चोरीचा माल शोधण्यात जंजीरने आपल्या तीक्ष्ण वास घेण्याच्या क्षमतेचा उत्कृष्ट वापर करून पोलिसांना अनेक वेळा यश मिळवून दिले. त्याच्या उल्लेखनीय सेवेमुळे जिल्हा पोलिस दलाला अनेक तपासांमध्ये मोठा हातभार लागला.
सेवानिवृत्ती समारंभात उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी जंजीरच्या कार्याचा गौरव करत त्याच्या निष्ठा, दक्षता आणि सेवाभावाला सलाम केला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘जंजीर’ला विशेष खाद्यपदार्थ व पुष्पहार अर्पण करून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
जळगाव पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी एकमुखाने सांगितले की, “जंजीर हा केवळ एक श्वान नव्हता, तर आमच्या दलाचा अविभाज्य सदस्य होता. त्याच्या सेवेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल झाली. त्याच्या आठवणी आमच्यासोबत कायम राहतील.”
पोलिस दलाच्या इतिहासात जंजीरचे योगदान आदर्शवत राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा