Top News

जळगावात सिंधी बांधव आक्रमक : अमित बघेल विरोधात संतापाची लाट, निषेधार्थ भव्य मोर्चा

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I छत्तीसगडमधील अमित बघेल या व्यक्तीने सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल तसेच संपूर्ण सिंधी समाजाबद्दल अप्रिय आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज जळगाव शहरात सिंधी समाज बांधवांनी मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले.

सकाळी शहरातील झुलेलाल मंदिरासमोर समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले. त्यानंतर हातात फलक, बॅनर आणि झुलेलाल यांच्या जयघोषात निषेध मोर्चाची सुरुवात करण्यात आली. मोर्चात महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. “भगवान झुलेलाल की जय”, “अमित बघेल मुर्दाबाद”, “सिंधी समाज एक आहे” अशा घोषणा देत वातावरण संतप्त बनले होते.

मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी अमित बघेलवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. समाजाच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांवर केवळ निषेध नव्हे तर कायदेशीर कारवाई करून उदाहरण घालावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

यावेळी समाजातील अनेक पदाधिकारी, व्यापारी, महिला मंडळाच्या प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चादरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला, मात्र समाजात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “भगवान झुलेलाल हे आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. त्यांच्यावर कोणीही अशोभनीय वक्तव्य केले, तर तो आमच्या अस्तित्वावर घाव आहे. प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ पावले उचलली नाहीत, तर संघर्षाचा इशारा देण्यात येईल.”

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने