जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सट्ट्याच्या टपरीवर बसलेल्या ३९ वर्षीय उल्हास गणेश पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ गोळी लागली असून, सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या चौघा संशयितांनी जुना सातारा परिसरातील सट्ट्याच्या टपरीवर अचानक गोंधळ घालत टपरीवरील रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी उल्हास पाटील यांनी त्यांना विरोध केला असता, संशयितांपैकी एका इसमाने जवळ असलेल्या कट्ट्यातून गोळी झाडली. गोळी थेट पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली.
गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या उल्हास पाटील यांना तातडीने भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवस्तीमध्ये घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, भुसावळ शहरात अवैध धंद्याशी संबंधित व्यक्तीवर झालेला हा पहिलाच गोळीबार असल्याची चर्चा असून, त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्यासह पोलिस अधिकारी व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
या प्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेने भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांकडून रात्रीच्या वेळी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची तसेच अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा