मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे आदेश
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान असलम खान यांना सेवेतील हलगर्जीपणा व कार्यात अनास्था दाखवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आदेश जारी केले आहेत.
सदर कर्मचारी वैद्यकीय देयकाचे कार्यासन सांभाळत असताना, विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा आवश्यक अभिप्राय न घेता, थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेसाठी देयक सादर करण्यात आले. तसेच, कार्यासनाशी संबंधित कामकाज वेळेत पूर्ण न करणे व अपूर्ण ठेवणे अशा गंभीर निष्काळजीपणाचे प्रकार त्यांच्या कडून आढळून आले.
सदर प्रकरणात नियमबाह्य वर्तन आणि प्रशासकीय प्रक्रियांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिस्तभंग कारवाईचा भाग म्हणून तत्काळ प्रभावाने निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.
या कारवाईतून मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्पष्ट केले आहे की, “जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शिस्त ही अनिवार्य आहे. कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही.”या कारवाईच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना संकेत दिले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा