Top News

अजित पवारांच्या मुलावर गंभीर आरोप; एकनाथ खडसेंचा नैतिकतेचा सवाल

कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहारात मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप, चौकशी समिती स्थापन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल ४० एकर जमिनीच्या व्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.

अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी या पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने अंदाजे १,८०० कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारावर फक्त ५०० रुपयांचीच स्टॅम्प ड्युटी भरल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणातील अनियमितता लक्षात घेता राज्य सरकारने चौकशीला सुरुवात केली आहे. या संदर्भात पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.

या प्रकरणात एकनाथ खडसे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “सदर जमीन महार वतनाची असल्यामुळे खरेदीपूर्वी महसूल आयुक्तांची परवानगी आवश्यक होती. मात्र, अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर असून तात्काळ रद्द करण्यात यावा.”

खडसे पुढे म्हणाले, “अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी या कंपनीचे भागभांडवल फक्त एक लाख रुपये आहे. मग ३०० कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी इतका मोठा निधी कुठून आला? कोणत्या खात्यातून व्यवहार झाला आणि तो पैसा कुठे जमा झाला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले, “मी महसूल मंत्री असताना माझ्या कुटुंबावर अनेक आरोप झाले होते. वास्तविक माझा त्या प्रकरणाशी थेट संबंध नव्हता, तरीही मी नैतिक जबाबदारी घेत मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र आता उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव प्रकरणात येऊनही त्यांच्यावर आरोप करणारे सर्व शांत आहेत.”

खडसे यांनी मागणी केली की, “सरकार आपल्या सहकाऱ्याच्या मुलाच्या कंपनीची चौकशी करणार, हे जनतेच्या गळ्याखाली उतरणार नाही. त्यामुळे ही चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्यात यावी, ज्यामुळे सत्य समोर येईल.”

ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी कधी काळी अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. आता ते दोघे एकत्र सत्तेत आहेत. मग पार्थ पवार यांच्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होईल का, हा प्रश्न जनतेच्या मनात आहे.”

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने