जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I इंदोर–हैदराबाद महामार्गावर मुक्ताईनगर शहराजवळ गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. अकोटवरून इंदोरकडे जात असलेली प्रवासी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने येणारा केमिकल टँकर यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात टँकरमधील एक व्यक्ती जागीच ठार झाला, तर सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा अपघात मुक्ताईनगर–बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ, महादेव मंदिरासमोर रात्रीच्या सुमारास झाला. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना तातडीने मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही वाहनांना क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. टँकरमध्ये रासायनिक द्रव्य असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. सुदैवाने टँकरमधील रासायनिक पदार्थ गळतीची घटना घडली नाही. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा