Top News

औट्रम घाटात ५.५० किमी लांबीच्या बोगद्याला केंद्र सरकारची मंजुरी - खा. स्मिता वाघ

₹२,४३५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील; मराठवाडा आणि खान्देशातील वाहतूक होणार अधिक सुरक्षित आणि सुलभ

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वात अवघड आणि धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या घाटावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि विलंबाचा सामना करावा लागत होता. आता या घाटावरून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने ५.५० किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सुमारे ₹२,४३५ कोटी खर्च होणार असून, टेलवाडी ते बोधरे या सुमारे १५ किलोमीटरच्या टप्प्यात हा बोगदा उभारला जाणार आहे. या बोगद्यामुळे संभाजीनगर–पुणे दरम्यानचा प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच अपघातांचे प्रमाण घटेल. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

 “औट्रम घाट आता इतिहासजमा होणार” — खासदार स्मिता वाघ
 “औट्रम घाटात अनेक अपघात झाले, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. घाटाऐवजी सुरक्षित बोगदा उभारावा, ही जनतेची मागणी होती. त्या अनुषंगाने वारंवार केंद्रीय पातळीवर वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा केला गेला.अखेर केंद्र सरकारने या भव्य प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरेल.”

खासदार वाघ यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सडक वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे इंधन बचत, वेळेची बचत, अपघातांमध्ये घट आणि पर्यावरणावरचा ताण कमी होईल.
या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी केला असून, केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

प्रकल्पाचे तांत्रिक तपशील :
बोगद्याची लांबी : ५.५० किलोमीटर
रस्त्याचा एकूण विस्तार : टेलवाडी ते बोधरे – १५ किलोमीटर
एकूण प्रकल्प खर्च : ₹२,४३५ कोटी
वाहन वेग : ताशी १०० किलोमीटरपर्यंत
रचना : डबल ट्यूब स्ट्रक्चर, अत्याधुनिक वायुवीजन, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग
सुरक्षा सुविधा : फायर सिस्टिम, डिजिटल सेन्सर, सीसीटीव्ही, वाहन नियंत्रण केंद्र

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने