तालुका पोलिसांची मध्यरात्री कारवाई; महिला दलालाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरालगत असलेल्या सावखेडा शिवारात राहत्या घरामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर तालुका पोलिसांनी धाड टाकत दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई २४ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा करण्यात आली. या प्रकरणात कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावखेडा शिवारातील गॅस गोदामाजवळील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी नितीन गणापुरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी डमी ग्राहक पाठवून पाळत ठेवली. डमी ग्राहकाने निश्चित सिग्नल म्हणून मिस कॉल दिल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा टाकला आणि कुंटणखान्याचा भंडाफोड केला.
या कारवाईत पोलिसांनी त्या ठिकाणावरून दोन महिलांची सुटका केली. दोन्ही महिला जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात उघड झाले की, या घराची मालकी असलेल्या महिलेशी दोन्ही महिलांचा संपर्क आला होता. त्यानंतर ती महिला त्यांना वेश्याव्यवसायासाठी घरी बोलावत होती आणि आर्थिक लाभ मिळवून देत होती.
कारवाईदरम्यान डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनंत अहिरे, योगिता नारखेडे, पोहेकॉ. धनराज पाटील, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील, सचिन साळुंखे, पोकॉ. योगिता पाचपांडे, प्रशांत ठाकूर आणि मनीषा पाटील यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणात कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६च्या कलम ३, ४ व ५ (१)(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक अनंत अहिरे करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा