जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित १४५ वर्षांची परंपरा लाभलेला श्रीराम रथोत्सव आणि वहन उत्सव सध्या भक्तीमय वातावरणात सुरू आहे. जळगावकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेला हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज सकाळी काकड आरती, महाअभिषेक तसेच सायंकाळी वहनाची नित्य मिरवणूक शहरातील विविध भागातून निघते. या वर्षीचा उत्सव कार्तिक एकादशीनिमित्त विशेष भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून, एकादशीनंतर ११ दिवसांच्या रथ वहनोत्सवानंतर पारंपरिक भव्य रथ मिरवणुकीने उत्सवाचा समारोप होणार आहे.
आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे सरस्वती वहन. हा कार्यक्रम गजानन पार्क, योगेश्वर नगर येथे श्री जगन्नाथ एकनाथ वाणी यांच्या घरी मोठ्या भक्तीभावाने पार पडला. यावेळी वहनाच्या पान-सुपारीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमानंतर भजन, भारुड सादरीकरण झाले. सरस्वती मातेची आरती झाल्यानंतर उपस्थित भक्तांना दूध-जलपान देण्यात आले.
कार्यक्रमाला श्री मंगेश महाराज, श्रीराम महाराज, पोलिस पाटील सुजित पाटील आणि अरुण मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शहराचे लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देत वहनाच्या पान-सुपारी कार्यक्रमासाठी आयोजकांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश वाणी परिवार, त्यांचे फ्रेंड सर्कल तसेच गजानन पार्कमधील महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.
१४५ वर्षांचा इतिहास असलेला हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो. श्रीराम मंदिर संस्थानच्या माध्यमातून होत असलेले हे आयोजन जळगाव शहराच्या सांस्कृतिक वैभवाची जाणीव करून देते.
टिप्पणी पोस्ट करा