आई मथुरेला तीर्थयात्रेसाठी, वडील मंदिरात असताना दुर्दैवी घटना
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील दौलतनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आई मथुरा येथे तीर्थयात्रेसाठी गेलेली असताना आणि वडील परिसरातील मंदिरात गेलेले असताना, खुशी ज्ञानेश्वर पिसे (वय १९) या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
खुशी ही इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेली असून ती आई-वडील व मोठ्या भावासह दौलतनगर भागात राहत होती. तिची आई सध्या मथुरा येथे तीर्थयात्रेसाठी गेलेली आहे, तर वडील घरापासून काही अंतरावर असलेल्या मंदिरात गेलेले होते. भावाही त्या वेळी बाहेर गेला होता.
दुपारच्या सुमारास घरी एकटी असताना खुशीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर भाऊ घरी परत आला असता त्याला बहिणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
🕯️ दुःखाचा सावट: या घटनेने दौलतनगर परिसरात शोककळा पसरली असून, पिसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
टिप्पणी पोस्ट करा