नवसंजीवनी देण्यासाठी करणार पाठपुरावा, स्थानिक रंगकर्मींनी मांडले गार्हाणे
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I बालगंधर्व नाट्यगृहाला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दि. 25 ऑक्टोबर रोजी सदिच्छा भेट देत परिस्थिती जाणून घेतली. यावेळी शहरातील रंगकर्मींची उपस्थिती लक्षणिय होती. स्थानिक कलाकारांनी बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या इतिहासाची उजळणी करून देत याला नवसंजीवनी मिळावी, अशी विनंती जिल्हाधिकार्यांना केली.
स्थानिक कलाकारांनी बालगंधर्व नाट्यगृहाला संजीवनी मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेशी संवाद साधत आपले गार्हाणे मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्या तोंडाला केवळ पानेच पुसण्यात आली आहे. दरम्यान, नव्या हिरिरीने काम करणारे आणि कलाकारांच्या भावना समजून घेणारे कलाप्रेमी जिल्हाधिकारी रोहन घुगे जळगाव जिल्ह्याला लाभल्याने स्थानिक रंगकर्मींना आता बालगंधर्व नाट्यगृह पुन्हा नव्याने सुरु होण्याची आशा दिसू लागली आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांनी बालगंधर्व नाट्यगृह नव्याने सुरु करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने रंगकर्मीमध्ये उत्साह संचारला आहे.
वर्तमानात जळगावचे सांस्कृतिक क्षेत्र विस्तार पावत आहे. जुन्या, अनुभवी रंगकर्मींच्या मार्गदर्शनाखाली नव्या सांस्कृतिक जाणिवांचे लेणं लेवून नवे शिलेदार विविध संस्थांच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवून जळगावचे काही काळापूर्वी हरविलेले सांस्कृतिक विश्व समृध्द करण्यासाठी कार्यरत आहेत. मात्र, 1961 मध्ये बांधण्यात आलेल्या बालगंधर्व नाट्यगृहाची अतिशय दुर्दशा झाली असून त्याकडे मनपाने सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. नाटकांच्या सुवर्ण काळातील असलेले बालगंधर्व खुले नाट्यगृह मनपाचे गोडाऊन आहे की काय, असा प्रश्न पडला आहे. बालगंधर्व नाट्यगृहाचा केवळ महानगरपालिकेतर्फे डम्पिंग ग्राऊंडसारखा उपयोग होत असल्याने बरेच कलाकार खिन्न झाले आहेत. स्थानिक कलाकारांना जर हे बालगंधर्व नाट्यगृह तालमीसाठी आणि नाट्यप्रयोगांसाठी मिळाले तर दर महिन्याला खान्देशातील कलाकार आपली कला सादर करून चांगला प्रेक्षकही निर्माण होण्यास मदत होऊ शकते, असा सूर यावेळी निघाला.
नारायणराव राजहंस अर्थात बालगंधर्वांनी त्यांच्या कार्यकाळात बालगंधर्व नाट्यगृहाचे उद्घाटन केले होते तर राज्य सरकारने यावेळी बालगंधर्व नाट्यगृहासाठी भरघोस निधीही दिला होता. यावेळी नानाविध नाटकांचे प्रयोग बालगंधर्व नाट्यगृहात होत असत. आधीच्या काळात परवीन सुलताना, भीमसेन जोशी यांनी केलेल्या कार्यक्रमांची आजही हे नाट्यगृह साक्ष देताना दिसत आहे. संगीत शारदा, संशय कल्लोळ, मानापमान, एकच प्याला यासारखी नाटकेही याठिकाणी झालेली आहेत. दरम्यान, कितीतरी संस्थांनी याठिकाणी आपली नाटके सादर केली असून महाराष्ट्रात लौकिक मिळवले आहे. पण आज या नाट्यगृहाने पुन्हा कात टाकून नव्याने उभारी घ्यावी, अशी सर्व रंगकर्मींची मनापासून तीव्र इच्छा आहे.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यकर्मी चिंतामण पाटील, रमेश भोळे, पीयूष रावळ, विनोद ढगे, अनिल मोरे, डॉ.वैभव मावळे, सचिन चौगुले, गौरव लवंगले, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, महेंद्र खेडकर, संदीप तायडे, किरण बोरसे, अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर, प्रदीप भोई, शिवानी नेवे आदी कलावंत उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा