जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहराच्या मध्यवर्ती वाघ नगर परिसरात गुप्तपणे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने केला आहे. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून तीन महिलांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतले आहे.
उपविभागीय अधिकारी गणापुरे यांना वाघ नगर भागातील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने ती पडताळून पाहिली. खात्रीशीर माहिती मिळताच त्यांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने संशयित घरावर छापा टाकला असता, तेथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, अशा बेकायदेशीर धंद्यांवर आता अंकुश बसण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या महिलांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रॅकेटचा सूत्रधार कोण आहे, तसेच या धंद्यात आणखी कोणी सामील आहे का, याचा सखोल तपास जळगाव तालुका पोलीस करत असून, रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा