दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासन मौन
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या गिरणा नदी पात्रात खुलेआम वाळू चोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. दिवाळीचा सण सुरू असताना देखील नदी पात्रात ट्रॅक्टर, डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे, हे सर्व काम महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू असून, याकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नदी पात्रातील वाळू चोरीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीची खोली वाढणे, पाण्याचा प्रवाह बदलणे व पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दिवाळीसारख्या सुट्ट्यांच्या काळात अधिकारी वर्ग सुट्टीवर असल्याचा फायदा घेत वाळू माफिया बेधडकपणे काम करत आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशांकडून समोर आली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, “रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टर व डंपरचे आवाज ऐकू येतात. काही वेळा पोलिस पथक येते पण कारवाई होत नाही. असे दिसते की माफियांना कुणाचे तरी अभय आहे,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयाकडे या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. महसूल विभाग आणि खनिकर्म शाखेने जर वेळेत नियंत्रण आणले नाही, तर नागरिकांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
👉 गिरणा नदीतील वाळू चोरीचे हे प्रकरण केवळ पर्यावरणीय हानीचे नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचेही द्योतक आहे. आता पाहावे लागेल की जिल्हाधिकारी रोहन घुगे या गंभीर प्रकाराकडे कितपत गांभीर्याने पाहतात.
टिप्पणी पोस्ट करा