Top News

जळगावात चित्रपटगृहातील शौचालयात तरुणीचे अर्धनग्न चित्रीकरण; १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील शाहूनगर परिसरातील एका मॉलमधील चित्रपटगृहात १९ वर्षीय तरुणीचे शौचालयात असताना शेजारील केबिनमधून अर्धनग्न अवस्थेत चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडला असून, याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे येथील एक १९ वर्षीय तरुणी दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने जळगावात तिच्या मामाकडे आली होती. २४ ऑक्टोबर रोजी ती आई आणि मावशीसोबत शहरातील शाहूनगर जवळील मॉलमधील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. संध्याकाळी चित्रपट संपल्यानंतर ती शौचालयात गेली असता, शेजारील केबिनमधून एक मुलगा तिचे मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचे तिला दिसले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली आणि त्या वेळी तिने कोणतीही तक्रार केली नाही. मात्र, काही वेळानंतर धैर्य एकवटून तिने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर ती २४ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आणि फिर्याद नोंदवली.

शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून, प्राथमिक चौकशीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलानेच हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेने शहरात संतापाची लाट पसरली असून, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने