४९८ कलमातील प्रकरणात २० हजारांची लाच घेतल्याचा आरोप; एसीबीच्या कारवाईने शहरात खळबळ
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहराच्या मध्यवर्ती भागातील जळगाव शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने गुरुवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत दोन हवालदारांना लाच घेताना रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या हवालदारांची नावे रवींद्र सोनार आणि धनराज निकुंभ अशी असून, या दोघांविरुद्ध अटकेची कारवाई सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ४९८ कलमांतील प्रकरणात सदर हवालदारांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.
पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस स्टेशनच्या आवारातच ही धडक कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीत दोन्ही हवालदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया एसीबीकडून सुरू आहे.
या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या कार्यप्रणालीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस दलातील भ्रष्टाचाराविरोधात अशा प्रकारच्या कारवायांमुळे जनतेमध्ये विश्वास वाढीस लागणार असल्याचे बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा