Top News

खळबळजनक : डांभुर्णी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण


वनविभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ठेलारी समाजातील मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षांची चिमुकली रत्नाबाई हिला बिबट्याने अलगद उचलून नेले आणि तिच्यावर क्रूर हल्ला करत ठार मारले. ही धक्कादायक घटना रात्री सुमारे १ वाजता उघडकीस आली.

प्रभाकर चौधरी यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ कुटुंबाच्या झोपडीत रत्नाबाई ही आपल्या आई जिजाबाईसोबत झोपलेली होती. अचानक बिबट्याने झोपेत असलेल्या रत्नाबाईवर हल्ला करत तिला उचलून केळीच्या शेतात नेले. काही वेळातच तिचा मृतदेह झाडाझुडपांमध्ये आढळून आला. त्यावेळी तिचे शरीर क्षत-विक्षत झालेले होते, हे दृश्य पाहून कुटुंबीय व ग्रामस्थ हदरून गेले.

या भीषण घटनेची माहिती मिळताच यावलचे तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी विपुल पाटील, पश्‍चिम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. डांभुर्णीचे पोलीस पाटील यांच्या माहितीवरून यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास सुरू असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत.

दरम्यान, सध्या रब्बी हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी व मजूर मोठ्या प्रमाणात शिवारात असतात. मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक शेतकऱ्यांनी शेतात जाणं टाळायला सुरुवात केली आहे.

ग्रामस्थांच्या मते, याआधीही बिबट्याच्या हालचाली शिवारात पाहण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटनाही नोंदवल्या होत्या. मात्र वनविभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने