Top News

चाळीसगावात मिरची बाजारात भीषण आग; जवळच असलेला पेट्रोल पंप बनला चिंतेचा विषय

नागद रोडवरील घटनेने चाळीसगाव शहरात खळबळ; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाची प्रयत्न 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारात आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत मिरची बाजार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे प्रचंड लोळ आणि आकाशात उडणारा धुराचा गुबार अनेक किलोमीटरपर्यंत स्पष्टपणे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, आग लागलेल्या ठिकाणापासून अगदी काही अंतरावरच पेट्रोल पंप असल्याने या आगीचे स्वरूप अधिकच धोकादायक ठरू शकते, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. पेट्रोल पंपासह परिसरातील इतर गोदामे आणि दुकाने यांना देखील या आगीचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून युध्दपातळीवर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी पोलीस प्रशासन, नगरपरिषद अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित असून नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून काही वेळ लागणार असल्याचे अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

या घटनेमुळे नागद रोडवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली असून नागरिकांनी घडलेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने