सीसीटीव्हीमध्ये कैद झाली चोरी; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरासह जिल्ह्यात चारचाकी वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, चोरट्यांनी आता आधुनिक व हायटेक पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका धक्कादायक घटनेत शहरातील प्रसिद्ध उद्योजक किशोर ढाके यांच्या मालकीची टोयोटा इनोव्हा कार काल, सोमवार ८ एप्रिल रोजी रात्री चोरट्यांनी लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांसमोर पुन्हा एकदा हायटेक चोरट्यांच्या टोळीचा मोठा आव्हान उभे ठाकले आहे.
किशोर ढाके हे कलेक्टर बंगल्याजवळील रहिवासी असून, नेहमीप्रमाणे त्यांनी आपली इनोव्हा कार घराबाहेर पार्क केली होती. रात्री उशिरा दोन अज्ञात चोरटे घटनास्थळी आले आणि अवघ्या काही मिनिटांत कार अनलॉक करून पळून गेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी कुठलाही आवाज न करता, डुप्लिकेट चिप कीच्या सहाय्याने कार अनलॉक केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते.
या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “आता वाहनांसाठी फक्त लॉक किंवा सिक्युरिटी अलार्म पुरेसा राहिलेला नाही, चोरटे यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत,” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, यामध्ये एखादी टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांवर ट्रॅकिंग डिव्हाईस, जीपीएस यंत्रणा तसेच इमर्जन्सी अलार्म सिस्टम बसवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा