जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शिवतीर्थ चौक ते स्टेडियम परिसरात मंगळवारी संध्याकाळी अचानक डोळ्यांची चुरचुर व त्रास होऊ लागल्याने वायुगतीची अफवा पसरली होती. मात्र, जळगाव पोलिसांच्या मॉकड्रिलदरम्यान अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाकडून अशा प्रकारची चाचणी नागरी वस्तीशेजारी का करण्यात आली? असा सवाल उपस्थित होत आहे.
सदरील घटना कशी घडली
शहराच्या मध्यवर्ती भागात शिवतीर्थ चौक ते स्टेडियम परिसरात मंगळवारी सायंकाळी अचानक नागरिकांच्या डोळ्यांत चुरचुर होऊ लागल्याने खळबळ उडाली. काहींना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, लहान मुलांना उलट्याही झाल्या. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दल, महापालिका आणि पोलिस प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले असून, प्राथमिक तपासणीत पोलिस ग्राउंडवरील मॉकड्रीलमध्ये वापरलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्यांमुळे हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास, सरकारी कार्यालये आणि शाळा सुटण्याच्या वेळेस, नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. नेमक्या याच वेळेस अचानक डोळ्यांमध्ये चुरचुर, श्वसनास अडथळा आणि अंगास अशक्तपणा जाणवू लागल्याने नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. वाहनधारकांनी घाईघाईने लहान मुलांना घेऊन रिंगरोडकडे मार्ग धरला. काहींनी तर घाबरून वाहने सोडून पळ काढला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांना उलट्या झाल्या, महिलांना डोळे उघडवत नव्हते. परिसरातील नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून, हवेत पसरलेला वायू नेमका कुठून आला, याचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोलिस ग्राउंडवर सुरू असलेल्या मॉकड्रीलमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. त्यातून बाहेर पडलेला वायू वाऱ्याच्या दिशेने पसरून शिवतीर्थ मैदान ते स्टेडियम परिसरात पोहोचल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या प्रकारामुळे २ ते ३ ज्येष्ठ नागरिकांना चक्कर आल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दमा व मधुमेहाचे रुग्ण होते. विशेष म्हणजे, एका डोळ्यांचे डॉक्टर देखील या वायूमुळे त्रस्त झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मनपा प्रशासनाने काही काळासाठी परिसरातील वाहतूक थांबवली.
सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “डोळ्यांना चुरचुर होत असल्यास ते चोळू नये. थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत. त्रास कायम राहिल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. शासकीय रुग्णालयात आवश्यक ती सर्व उपचार व्यवस्था उपलब्ध आहे,” असे ते म्हणाले.
अशा वेळेस नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
डोळ्यांना चुरचुर झाल्यास चोळू नये
थंड पाण्याने डोळे स्वच्छ करावेत
श्वास घ्यायला त्रास होत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
शक्यतो अशा परिसरात न जाणेच योग्य
संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू असून, अधिकृत माहिती प्रतीक्षेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा