जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) येथील एक इसम गावठी पिस्तूल बेकायदेशीररीत्या बाळगून परिसरात दहशत माजवण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर, अचूक कारवाई करत पोलिसांनी संबंधित इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अर्जुन जनार्दन कोळी (वय ३०, रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) नामक इसम प्रेम प्रतीक टी सेंटर (घोडसगाव-मुक्ताईनगर रोड) परिसरात गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित इसमाला ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत त्याचे नाव अर्जुन कोळी असल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना अंदाजे २०,००० रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आढळून आले. संबंधित शस्त्र बेकायदेशीररीत्या बाळगल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.नं. ९९/२०२५, भा.दं.वि. कलम ३/२५ भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहवा प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे व रविंद्र चौधरी (सर्व स्था. गु. शाखा, जळगाव) यांच्या पथकाने केली.
संपूर्ण ऑपरेशन मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा