जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील (एलसीबी) तिघा पोलीस कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. हप्तेखोरी, व्हिडीओ पुरावा आणि फरार आरोपीशी तब्बल 352 वेळेस झालेला फोन संपर्क या गंभीर प्रकरणांमुळे ही कारवाई केल्याचे उघड झाले आहे.
हप्ता घेताना व्हिडीओ कैद; दोन कर्मचाऱ्यांची उचलबांगडी
एलसीबीचे कर्मचारी गजानन देशमुख आणि संघपाल तायडे यांनी गुटखा व पेट्रोल विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून हप्ता घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ थेट एसपींना पाठविण्यात आला होता. संबंधित व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतर आणि पुरावे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी देशमुख आणि तायडे यांची तत्काळ उचलबांगडी करत अनुक्रमे पाचोरा आणि फत्तेपूर येथे बदली केली आहे.
ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीशी 352 वेळा फोनवर संपर्क
एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांच्याविरुद्ध आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी अरबाज याच्याशी त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून तब्बल 352 वेळा संपर्क साधल्याचे रेकॉर्डवर आले आहे. या गंभीर बाबीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलिस नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे.
अनेक कारवाया; पोलिस दलात खळबळ
अलीकडील काही दिवसांत पाचोरा तालुक्यात वाहनधारकांकडून पैसे स्वीकारणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर जळगाव शहर पोलिस स्थानकातील दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले. आता एलसीबीतील ताज्या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
या सर्व प्रकरणांमुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने भ्रष्टाचार व गैरप्रकारांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले असून, अशा गंभीर प्रकरणांमध्ये कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा