जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I ग्रामविकास विभागातर्फे सन २०२२-२३ या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक श्री. मिलिंद मनोहर लोणारी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय, तांत्रिक आणि वैयक्तिक कौशल्याची दखल घेत शासनाने त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णय दिनांक २ सप्टेंबर २००५ नुसार ही पुरस्कार योजना सन २००५-०६ पासून सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत दरवर्षी मंत्रालयातील तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून गुणवंत व्यक्तींची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी लोणारी यांचे कार्य विशेषत्वाने उजळून आले आहे.
या आधी देखील मिलिंद लोणारी यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाला होता. २३ जानेवारी २०२३ रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.
श्री. लोणारी यांनी जिल्हा परिषद जळगावच्या आरोग्य विभागात कार्यरत असताना जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी म्हणून काम पाहिले असून, त्यांनी विविध आरोग्य योजनांची प्रभावी प्रसिद्धी केली. विशेषतः कोविड महामारीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना पुणे येथील सहाय्यक संचालक यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले होते.
राज्य शासनाच्या वतीने हा त्यांचा तिसरा सन्मान असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. ग्रामीण आरोग्य सेवेसाठी त्यांनी दिलेल्या समर्पणाची ही उज्वल पावती ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा