जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षांच्या बालिकेवर झडप घालून ठार करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने लावलेल्या सापळ्यात पकडले आहे. बिबट्याला बेशुद्ध करून नागपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील घनदाट अरण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
यावल तालुक्याच्या पश्चिम भागात, विशेषतः किनगाव-डांभुर्णी परिसरात, गेल्या काही काळापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात किनगाव शिवारात एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी, डांभुर्णी शिवारातील रत्ना रूपनर या दोन वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला करून तिचा जीव घेतला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
घटनेनंतर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वन विभागाने त्वरित हालचाल करत बिबट्याला पकडण्यासाठी शिताफिने नियोजन केले. बिबट्या एका ठिकाणी शिकार केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी येतो, हे लक्षात घेऊन वन खात्याने शेळ्या-मेंढ्यांनी युक्त असलेला पिंजरा डांभुर्णी शिवारात ठेवला.
गेल्या रात्री सुमारे साडेनऊ वाजता बिबट्या त्या ठिकाणी परत आला आणि पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर त्याला बेशुद्ध करणारे इंजेक्शन देण्यात आले. वन विभागाने सांगितले की, बिबट्याला आता नागपूर जिल्ह्यातील बोरगाव परिसरातल्या सुरक्षित आणि घनदाट जंगलात हलवण्यात येणार आहे.
या कारवाईमुळे ग्रामस्थांनी काहीसा दिलासा घेतला असला तरी अजूनही परिसरात बिबट्यांची भीती कायम असल्याने वन विभागाकडून नियमित गस्त आणि खबरदारीची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा