Top News

आरोग्य अधिकारी १५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक, तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागितली होती लाच

जळगाव जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात एसीबीची कारवाई; अधिकाऱ्याने मागितली होती ३० हजारांची लाच

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी रंगेहाथ लाच घेताना अटक केली. अधिकाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबीने पडताळणी करून सापळा रचत १५ हजार रुपये घेत असताना त्याला ताब्यात घेतले.

तक्रारदाराने जळगाव येथील एसीबीकडे अधिकाऱ्याने लाच मागितल्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची प्राथमिक पडताळणी करण्यात आली. लाच मागितल्याची बाब खरी असल्याचे स्पष्ट झाल्यावर, एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली.

सदर आरोपी हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत असून, त्याने तडजोडीअंती तक्रारदाराकडून १५ हजार रुपये घेत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. यासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असून, जळगाव एसीबीचे अधिकारी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेत आहेत. एसीबीच्या या कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई जळगाव एसीबीचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास एसीबीच्या पथकाकडून सुरु आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने