वाहनाचा कट लागण्यावरून वाद, दुकाने व वाहने जाळून दंगलीचा फड; ११ दुकाने, ४ वाहने जळून खाक
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात ३१ डिसेंबर रोजी रात्री वाहनाच्या कटावरून जातीय दंगल घडली, ज्यामध्ये दुकाने आणि वाहने जाळली गेली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. या दंगलीत ११ दुकाने आणि ४ वाहने जाळून एकूण ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री वाहनाच्या कटावरून वाद निर्माण झाला होता, त्यानंतर पाळधी गावातील २० ते २५ जणांच्या अज्ञात जमावाने रस्त्यावर बंद असलेली दुकाने आणि ४ चारचाकी वाहने पेटवून दिली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दगडफेक आणि जाळपोळीमुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले.
या दंगलीत, यासीर अमित देशमुख यांच्या मोबाईल दुकानात दीड लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले, जावेद पथरू पिंजारी यांच्या चप्पल दुकानाला आग लावून ८ लाखांचे नुकसान झाले. तसेच शेख हबीब शेख शरीफ यांच्या पानसेंटरला आग लावून २ लाख ३० हजार रुपये किमतीचे नुकसान झाले. वकार अहमद शेख शकील यांच्या घरासमोरील दोन दुचाकी आणि घरावर दगडफेक करून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
फारुक शेख शरीफ यांच्या इलेक्ट्रिक दुकानाला आग लावून ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. एजाज युसूफ देशमुख यांच्या मक्का शॉपिंग कॉम्प्लेक्समधील ऑटो पार्ट्स दुकान फोडून ३ लाख रुपये किमतीचे सामान चोरीला गेले. दानिश शेख सत्तार यांच्या रेफ्रिजरेटर दुकानात तोडफोड करून १० लाख रुपयांचे नुकसान झाले. शेख साबीर शेख सादिक यांच्या मोबाईल शॉपच्या शटर तोडून नवीन मोबाईल व एलसीडी यांची तोडफोड केली, ज्यामुळे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. अक्रम खान अन्वर खान यांच्या दुकानातून ४० हजार रुपये किमतीचे अंड्यांचे नुकसान झाले. रफिक खान अन्वर खान यांच्या आमलेट सेंटर हातगाडीचे नुकसान करून ३ हजार रुपयांचे नुकसान झाले.
त्याचबरोबर, राष्ट्रीय महामार्गावर शेख तसव्वर शेख हमीद यांच्या मालकीच्या ४ वाहने जाळली गेली, ज्यामुळे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वमिलून अंदाजे ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी जावेद पथरू पिंजारी यांच्या फिर्यादीवरून पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात २० ते २५ जणांविरुद्ध दंगलीसह तोडफोड आणि आग लावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाळधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा