गॅस सिलेंडर साठवून वाहनांमध्ये भरत असताना पोलिसांनी केली मोठी कारवाई; २ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I गॅस सिलेंडर साठवून वाहनांमध्ये भरत असताना आज जळगाव शहरातील पिंप्राळा भागात सकाळच्या सुमारास आढळून आल्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात घरगुती गॅसच्या काळाबाजार संदर्भात आज सकाळपासून मोठी कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मोहिम राबवण्यात आली. त्यानुसार, वसीम चंगा शहा (वखार जवळ पिंप्राळा), अकलाख खान जहांगीर खान (खाजा नगर पिंप्राळा), फिरोज अलाउद्दीन शेख (पिंप्राळा हुडको) आणि जुबेर खान उस्मान खान पठाण (पिंप्राळा हुडको) या चार आरोपींना घरगुती गॅसचा काळाबाजार करताना ताब्यात घेतले.
आरोपींना घरगुती गॅस सिलेंडरची साठवणूक करून ते वाहनांमध्ये भरत असल्याच्या आरोपावरून पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ११ घरगुती गॅस सिलेंडर, ५ मोटारी, गॅस भरण्याचे साधन आणि दोन वजन काटे जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत २ लाख १ हजार रुपये इतकी आहे.
या कारवाईच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, हरिलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, पोलीस चालक भरत पाटील आणि रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी झाली. आरोपींविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये चार गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यानुसार, हा प्रकार लक्षात घेत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे, गॅसचे काळाबाजार रोखण्यासाठी पुढील कारवाया राबवण्याचे सूचित केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा