👉 निवडणुकीच्या रणधुमाळीत जेल एन्ट्री! ललित कोल्हेंना न्यायालयाची परवानगी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली असून, नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना निवडणूक प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी जळगाव कारागृहात येण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी दि. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, बोगस कॉल सेंटर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी महापौर ललित कोल्हे हेही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज भरणे व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना जळगाव कारागृहात आणण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्जाद्वारे केली होती.
न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत दि. 29 डिसेंबर ते दि. 3 जानेवारी या कालावधीत ललित कोल्हे यांना जळगाव कारागृहात ठेवण्यास परवानगी दिली आहे.
🔴 जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
बोगस कॉल सेंटर प्रकरणात संशयित म्हणून अटकेत असलेल्या ललित कोल्हे यांचा जामीन अर्ज खालच्या न्यायालयाने फेटाळला आहे. त्या निर्णयाविरोधात ते आता उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
त्यामुळे कोल्हे हे निवडणुकीपूर्वी जामिनावर मुक्त होतात की कारागृहातूनच निवडणूक लढवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा