Top News

यावल: फैजपूर रस्त्यावर हरिओम नगरातील दुकानाला आग, १४ लाखांचे नुकसान


शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, शेजारील घराचेही ३९ हजारांचे नुकसान

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी - यावल I शहरातील फैजपूर रस्त्यावर स्थित हरिओम नगरातील एका दुकानाला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली. 'संजेरी ग्लास' हे शेख जाकीर शेख कमरोद्दिन आणि शेख अत्तमस शेख जाकीर यांचे दुकान आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये प्लायवूड, अल्युमिनियमच्या खिडक्या, दरवाजे, विविध प्रकारच्या मशिनरी, काच व फर्निचर यांचा समावेश आहे. आग लागल्याची माहिती मिळताच यावल नगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. तथापि, तोपर्यंत दुकानातील सर्व सामग्री जळून खाक झाली होती. 

तपासणीनुसार दुकानदाराचे १४ लाख रुपये मूल्याचे साहित्य आगीमध्ये जळाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. शेजारील घरालाही आगीचा फटका बसला असून, त्याचे ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महसूल विभागाने पंचनामा केला असून, पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, परंतु तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने