जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेचा फटका आता सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. जळगावमधील गजबजलेल्या मु. जे. महाविद्यालयासमोर असलेल्या मोठ्या गटारीचा स्लॅब गेल्या अनेक वर्षांपासून तुटलेला आहे. याच उघड्या गटारात ३० मार्च रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास एक दुचाकीस्वार थेट कोसळल्याची खळबळजनक घटना घडली. सुदैवाने, परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च रोजी रात्री उशिरा एक तरुण आपल्या दुचाकीने मु. जे. महाविद्यालय परिसरातील वळणावरून जात होता. या ठिकाणी असलेल्या गटारीचा स्लॅब आधीच तुटलेला असल्याने आणि रात्रीच्या वेळी अंधार असल्याने तरुणाला या धोक्याचा अंदाज आला नाही. परिणामी, त्याची दुचाकी थेट उघड्या गटारात जाऊन कोसळली. अपघात होताच परिसरातील काही जागरूक नागरिक मदतीला धावून आले आणि त्यांनी अथक प्रयत्नांनंतर तरुणाला सुखरूप बाहेर काढले.
प्रशासनाचे वर्षानुवर्षे दुर्लक्ष
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुख्य रस्त्यावरील गटारीचा स्लॅब गेल्या अनेक वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. हे ठिकाण ऐन वळणावर असल्याने वाहनधारकांसाठी तो 'डेथ ट्रॅप' ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तुटलेल्या स्लॅबपासून काही अंतरावरच याच गटारीचा दुसरा स्लॅब देखील तुटलेला आहे. प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
खाद्यप्रेमींचीही वर्दळ, धोका वाढला
ज्या ठिकाणी हे स्लॅब तुटलेले आहेत, तिथेच संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांची या भागात मोठी गर्दी असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी उघडी गटार असणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहे. कोणत्याही क्षणी एखादा पादचारी किंवा लहान मूल यात पडून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांची मागणी
"कुणी लक्ष देणार की नाही?" असा संतप्त सवाल आता जळगावकर उपस्थित करत आहेत. या ठिकाणी तातडीने नवीन सिमेंट स्लॅब टाकण्यात यावा किंवा किमान लोखंडी जाळी तरी बसवावी, अशी मागणी जोर धरत आहे. एखादा मोठा बळी गेल्यावरच महापालिका प्रशासनाला जाग येईल का? असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा