Top News

दुकान खाली करण्यावरून वाद; मेहरुणमध्ये लग्नघरावर ५०-६० जणांकडून दगडफेक


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरात दुकान खाली करून देण्यावरून झालेल्या वादाचा मोठा भडका उडाला असून मेहरुण परिसरातील एका घरावर ५० ते ६० जणांच्या टोळक्याने तुफान दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या घरावर ही दगडफेक झाली, तिथे आदल्या दिवशीच मुलीचे लग्न पार पडले होते. या हल्ल्यात घराबाहेरील दुचाकीचे नुकसान झाले असून, दगड लागल्याने तीन मुले जखमी झाली आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण परिसरात राहणारे अकील शहा मेहमूद शहा (६०) यांच्या घराशेजारी दोन दुकान गाळे आहेत. हे दुकान खाली करून देण्यावरून काही मंडळींसोबत त्यांचा वाद सुरू होता. मंगळवारी (३१ मार्च) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी जमावाने अकील शहा यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या घरावर ५० ते ६० जणांच्या टोळक्याने दगडफेक सुरू केली.


या घरात सोमवारीच मुलीचे लग्न झाल्याने पाहुणे मंडळींची मोठी वर्दळ होती. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे लग्नघरातील महिला आणि पाहुणे भयभीत झाले. या दगडफेकीत वीट लागल्याने कैफ इम्रान शहा (१८), जिदान शहा दानिश शहा (६) आणि मिश्कात शहा नईम शहा (११) हे तिघे जखमी झाले आहेत. तसेच घराबाहेर उभी असलेली दुचाकी (क्र. एमएच १९, डीई ३२३६) हिचा हेडलाईट फुटून नुकसान झाले आहे.


घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून मेहरुण परिसरात पोलीस आणि होमगार्डचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने