Top News

गावठी कट्ट्याचा स्फोट; अमळनेरमध्ये तरुणाचा मृत्यू, शाह आलम नगरात खळबळ



जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात शुक्रवारी (दि. २७) रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शाह आलम नगर परिसरात सुमारे रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला. अरुण सुरेश महाजन असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अरुण महाजन हा गावठी कट्टा हाताळत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कट्टा हाताळताना अचानक गोळी सुटल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे शाह आलम नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत परिसरात पोलिसांची वर्दळ सुरू होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ही घटना अपघाती आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून संबंधितांकडून माहिती घेतली जात आहे. घटनेमागील नेमके कारण पुढील तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने